Pune Deenanath Mangeshkar Hospital Case: पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या एका दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असे लिहीत नाही. माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असे केलं नव्हते. पण त्यादिवशी राहु केतु डोक्यात काय आले आणि या लोकांनी डिपॉझिट लिहून दिले काय माहिती नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. केळकर यांनी दिली. यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत टीका केली आहे.
काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ क्लिनचीट द्यायची आहे?
मंगेशकर रुग्णालय प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल अखेर समोर आला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सातत्याने मागणी करत आलो आहोत या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय असूनही रुग्णांकडून पैसे घेऊनच उपचार केले जातात. ही कोणती सेवा? हा कोणता धर्म? डॉक्टरांनी राजीनामे देत जबाबदारी झटकली, आणि आता पळवाट शोधण्याचे काम सुरु आहे! सरकार अजून तरी नक्की कशाची वाट बघत आहे? पुन्हा काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ सरळ क्लिनचीट द्यायची आहे?? या प्रकरणातील डॉक्टर असो किंवा रुग्णालय प्रशासन जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे!, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, डिपॉझिट सगळ्यांकडून घेत नाही. गरीब लोकांकडून तर अजिबातच घेत नव्हतो. ज्यांना जमेल त्यांना पैसे मागितले जात होते. पण या प्रकरणानंतर आम्ही डिपॉझिट हि पॉलिसी रद्द केली आहे. इथून पुढे ती घेतली जाणार नाही. सुश्रुत घैसास हे कन्सल्टन्ट म्हणून १० वर्षे काम करत आहेत. त्यांनी दडपणाखाली वागत असून, धमक्यांचे फोन पाहता मी राजीनामा देत आहे. मला व्यवस्थित काम करता येणार नाही. म्हणून राजीनामा देत आहे असे त्यांनी पत्रकात लिहून देऊन आमच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे, असे डॉ. केळकर यांनी म्हटले आहे.