Vijay Wadettiwar News: काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या घटनेला काही दिवस लोटले असतानाच मुंबईतील काँग्रेसचे दुसरे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.
मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आता ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत आहे. आणखी अनेक गोष्टी आहेत ज्या आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे, अशी एक्सवर पोस्ट करत बाबा सिद्दीकी यांनी आपला निर्णय जाहीर केला. यावरून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
ते गेले म्हणजे पक्ष गेला असे नाही
ते गेले म्हणजे पक्ष गेला असे नाही. सिद्दीकी हे धर्मांध पक्षात जात आहेत. ज्यांच्या मागे एजन्सी लागली ते विचारधारा सोडून जात आहेत. या लोकांसाठी सत्ता आणि संपत्ती सर्वोच्च आहे. ते सत्तेसाठी गेलेले आहेत. यांना काही विचार नाही, आयडॉलॉजी नाही, लोकांचे हित नाही. अधिकाधिक काय मिळवता येईल, हा उद्देश ठेवून ही मंडळी फुटलेली आहेत. चौकशीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळावी, याच उद्देशाने ते फुटले आहेत. अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची? अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, ते अजित पवार यांच्या पक्षात जात असले तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुले आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ही एक बोलण्याची पद्धत आहे. बाबा सिद्दिकी राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घ काळ होते. त्यांचे चिरंजिव त्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. अशी विधाने करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. अपयश झाकण्याचा माणसे प्रयत्न करतात, तेव्हा ते सत्य परिस्थितीपासून दूर जातात, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.