Congress Vijay Wadettiwar News: शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आसूड ओढले आहेत. टक्केवारीत अडकलेल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण असून या घटनेची चोकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मीडियाशी बोलताना, वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते तो महाराजांचा पुतळा कोसळला आहे. आठ महिन्यात छत्रपतींच्या पुतळ्याची ही अवस्था झाली आहे. यासारखे दुर्दैव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून वाटचाल करणारे हे सरकार नाहीच, हे आता सिद्ध झाले आहे. राज्यातील महायुती सरकार हे महाविनाशी सरकार आहे. आम्ही का म्हणतोय हे महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
महाराजांची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा व्हावी
या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, महाराजांची अवहेलना करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे, संबंधित कंत्राटदाराची सुरू असलेली सर्व कामे तातडीने काढून घ्यावीत, महाराजांची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.