Mla Disqualification Case Verdict: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्रतेप्रकरणी दिलेला निकाल हा स्क्रिप्टेड होता. मुद्दाम वेळ वाढवून उशिराने निकाल दिला गेला. एकास पात्र आणि दुसऱ्यास अपात्र ठरवले असते तर जनतेचा उद्रेक झाला असता म्हणून दोन्ही गटास पात्र करण्यात आले आहे. मात्र हा अंतिम निकाल नाही. राज्यातील जनता योग्यवेळी त्यांना आपली जागा दाखवेल, या शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड अवैध ठरवली असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती वैध ठरवली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अवमान करत कायद्याप्रमाणे निकाल दिला नाही. या निकालात पक्षांतर बंदी कायद्याची खिल्ली उडविण्यात आली आहे. देशातील लोकशाही संपविण्यासाठी हा घातक निर्णय आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.
सहानुभूती मिळू नये म्हणून दोघांनाही पात्र केले
सहानुभूती मिळू नये म्हणून दोघांनाही पात्र केले आहे. देशाची घटना शिल्लक राहिली पाहिजे. शिंदे गटाला पात्र ठरवले आहे आणि उद्धव ठाकरे गटाला अपात्र ठरविले असते तर सहानुभूती मिळाली असती, असे म्हणत पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर चाललेली मस्ती खपवून घेतली जाणार नाही. ठाकरे आणि मराठी माणूस हे एक समीकरण आहे. हा निकाल मराठीत वाचणे अपेक्षित होते. मात्र तो इंग्रजीत वाचण्यात आला, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बहुमताच्या आधारावर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची २०१८ची घटनाच ग्राह्य धरता येत नाही. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच अस्तित्वात नाही. घटनेनुसार अधिकार कार्यकारिणीला असून, पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना पदावरून हटविण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. त्यामुळे शिंदेंनी नियुक्त केलेले भरत गोगावले हेच पक्षाचे व्हिप असून, सुनील प्रभू यांना व्हिप बजावण्याचा अधिकार नाही. दोन्ही गटांच्या व्हिपमध्ये कारवाईबाबत कोणतीही ठोस नोंद नसल्याने दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र ठरविता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.