Maharashtra Politics: “...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:03 PM2023-02-09T18:03:05+5:302023-02-09T18:04:08+5:30
Maharashtra News: ...तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते, असा विश्वास काँग्रेस नेत्याने व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आणि महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याबाबत काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोलेंसारखा सक्षम नेता विधानसभेच्या अध्यक्षपदावर विराजमान होता. त्यांनी सभागृह उत्तमपणे चालवले. सभागृहाचे नियंत्रण त्यांच्या हातात होते. परंतु त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. तसेच नवीन अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी अनेकांच्या भावना होत्या की, नानाभाऊंनी राजीनामा द्यायला नको हाता. नानाभाऊंनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार टिकले असते, अशा सर्वांच्या भावना होत्या, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरातांचा राजीनामा मंजूर झाला का?
विजय वडेट्टीवार यांनी दिल्ली येथे जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात यांनी दिलेला विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा मंजूर झाला आहे का? यावर, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही ही गोष्ट काँग्रेस हायकमांड ठरवेल, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय देखील काँग्रेस हायकमांड घेईल. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी राज्यातली परिस्थिती त्यांच्या कानावर घातली, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"