Vijay Wadettiwar News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही दावे करीत असले तरी, त्यांच्यामुळेच भाजपाने विश्वासहर्ता गमावली. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला देशभरात अडीचशेचा आकडाही पार करता आलेला नाही. महाराष्ट्रात भाजपा पक्ष एका आकड्यावर आला. भाजपाचे ७९ उमेदवार एक लाख मतांच्या फरकांनी पराभूत झाले आहेत. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेनी नाकारले आहे. राज्यातील त्रिकूट सरकारचा अनैतिक कारभार सुरू आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनाझरमध्ये छापून आलेल्या लेखात अजित पवार गटाला भाजपामध्ये घेतल्यावरून टीका करण्यात आली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ऑर्गनायझरच्या लेखातून जे म्हटले गेले, त्यातून जर बोध घेतला गेला, तर भाजपा काही शिकते, असे दिसेल. लोकसभेत अनेक जागांवर जागांवर काही हजार मतांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला असता तर सत्ता आमची आली असती, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात जर या निवडणुकांच्या नंतर सर्व्हे केला तर भाजपाची खरी परिस्थिती समजून येईल. महाविकास आघाडीला आता कुणीही पराभूत करू शकत नाही, ही आघाडी भक्कम आहे, असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला.
छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर प्रतिक्रिया देताना, छगन भुजबळांचा कुणी अपमान केला असेल तर त्यांनी त्याचा सूड विधानसभा निवडणुकीत घ्यावा. ज्यांनी भुजबळांचा अपमान केला त्यांच्याविरोधात बंड पुकारून भुजबळांनी आपले बळ दाखवावे, असे थेट आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.
दरम्यान, महायुती सरकारच्या काळात आता महाराष्ट्रात एवढे सगळे घोटाळे झाले, त्यावेळेस अण्णा हजारे बोलले नाहीत. मागील पाच वर्षात आम्ही अनेरक गंभीर प्रकरणे समोर आली. भाजपच्या दहा मंत्र्यांवर गंभीर आरोप होते. त्यावेळी नेमके अण्णा आजारी होते, झोपी गेले होते. आता अण्णा जागे झाले याचा आनंद आहे, असा चिमटा विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना काढला.