Maharashtra Politics: अजित पवार हे आमचेचे नेते आहेत ,राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. दादा आमचे नेते आहेत,असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच केले आहे . शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचे समर्थन केल्याचे दिसून येते . शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे तेच सांगू शकतील. कदाचित त्यांना पक्षाची काळजी असेल. निवडणूक आयोग आणि न्यायालयात प्रकरण सुरू असताना मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पक्षात फूट नाही, असे सांगणे त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. मात्र, आम्ही त्यात खोल जाण्याचा संबंधच येत नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
आम्हाला धोका वाटण्याचे काही कारण नाही
आम्हाला धोका वाटण्याचे काही कारण नाही. आमच्याबरोबर शरद पवारांप्रमाणे अनेक आघाड्या आहेत. या सगळ्याचे उत्तर एकच आहे की, निवडणुकांची घोषणा होईल, आघाडीत वाटप होईल आणि त्यावेळी जे ठरेल ते त्यावेळची परिस्थिती असेल. स्वार्थासाठी अनेकजण बरबटले आहेत. अनेकांना विचारांचे, लोकांच्या मताचे काही देणेघेणे राहिलेले नाही. लोकांना गृहित धरून राज्य खड्ड्यात घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत चित्र स्पष्ट झालेले दिसेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान, कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार आहे. जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहते आहे. पैशाच्या भरवशावर लोकांना विकत घेऊ असे वाटत असेल, पण जनता यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात ते दिसेल, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.