Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून काँग्रेसच्या एका नेत्याने प्रतिक्रिया देताना पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षातील सुरू असलेल्या घडमोडींवर भाष्य केले. बाळासाहेब थोरातांचा राजीनामा हा दुर्दैवाची बाब आहे. मात्र, राजीनामा मान्य करायचा की नाही, हा हायकमांडचा निर्णय आहे. याबाबत हायकमांड योग्य निर्णय घेईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत समन्वयाने, समोपचाराने आणि आपापसात ताळमेळ ठेऊन काम केले पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण...
अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये नाशिक येथून सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, मुलासाठी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांच्याऐवजी मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यानंतर काँग्रेसने सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई केली. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना, सत्यजित तांबे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. यात सत्यता आणि वस्तुस्थिती काय आहे, यावरून लोकांत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. चूक झाली असेल तर कारवाई करावी. पण, विनाकारण, कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, भाजपाच्या गडात आम्ही विजय मिळवला आहे. अमरावती विधानपरिषदेची जागा गृहित धरली नव्हती, तरी लोकांनी निवडून दिले. विदर्भ हा भाजपचा गड होता; पण लोकांनीच त्याला सुरुंग लावण्याचे काम केले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"