Congress Vijay Wadettiwar News: गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या भाजपा नेत्यांसोबतच्या गाठी-भेटी वाढल्या आहेत. मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सूचक विधान केले आहे. मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार असून, राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या समावेशाबाबत काही घोषणा करतात का, याची उत्सुकताही लागली आहे. यातच काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे वाघ माणूस आहे, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ३३ मिनिटे भाषण केले. मात्र, त्यात सगळे विषय हे केंद्राचे होते. त्यांच्या भाषणात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी काय देणार किंवा चंद्रपूरसाठी तुम्ही काय आणणार, यावर ते काहीही बोलले नाही. भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्यांच्या सारखा मुरब्बी आणि मातब्बर राजकारणी अशा पद्धतीने वक्तव्य करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
राज ठाकरे वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सुरु
राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राज ठाकरे हे दिल्लीच्या सत्तेपुढे कधीही झुकणार नाही, असे ते वारंवार सांगत होते. मात्र, दिल्लीची वारी त्यांना करावी लागली. यात कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचे, त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे का, अशी शंका सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची भूमिका ही सत्ताधारा विरोधात नसेलच असा कयास सध्या बांधण्यात येत आहे. राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. म्हणूनच राज ठाकरे जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असेल. दिल्लीश्वरापुढे झुकणारे नसेल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.