Maharashtra Politics: अजित पवार हे आमचेचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. दादा आमचे नेते आहेत,असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच केले आहे . शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचे समर्थन केल्याचे दिसून येते . यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का, या प्रश्नावर काँग्रेस नेत्यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाबाबत शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले.
शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का?
मीडियाशी बोलताना, शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का?, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना करण्यात आला. कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार आहे. जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहते आहे. पैशाच्या भरवशावर लोकांना विकत घेऊ असे वाटत असेल, पण जनता यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात ते दिसेल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे तेच सांगू शकतील. कदाचित त्यांना पक्षाची काळजी असेल.आम्हाला धोका वाटण्याचं काही कारण नाही. आमच्याबरोबर शरद पवारांप्रमाणे अनेक आघाड्या आहेत. स्वार्थासाठी अनेकजण बरबटले आहेत. लोकांना गृहित धरून राज्य खड्ड्यात घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत चित्र स्पष्ट झालेले दिसेल, असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला.