Congress Vijay Wadettiwar News: महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला दहा रुपयात चांगले अन्न मिळते. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
...तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा
राज्य सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाचे मंत्री असताना त्यांच्या खात्यात घोटाळे झाले, त्यावेळी आयुक्तांची आणि सचिवांची बदली झाली होती. आता विविध आरोप होत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकार का घेत नाही, इतकी या सरकारची काय मजबुरी आहे, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महायुती सरकारची इभ्रत वाचवायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस आहे. बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून सोयाबीन खरेदीचा कोटा वाढवून घ्यावा, शेतकऱ्यांकडे जितका सोयाबीन आहे तो खरेदी करावा. सरकारने सोयाबीन शेतकऱ्यानं दिलासा दिला नाही तर शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करू आणि सगळा सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठेवू, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.