Vijay Wadettiwar, Badlapur Case: बदलापूर शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सध्या राज्यभरात जनक्षोभ उसळला आहे. राज्यासह देशाच्या विविध भागात या घटनेविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या घटनेबाबत तपासादरम्यान विविध बाबी समोर येत आहेत. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी घटना घडली, त्याच्या आसपासच्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज सेव्ह केले नसल्याने त्याचे रेकॉर्डिंग मिळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले असून त्यांच्यावर बोचरी टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"राज्यातून सरकार आणि गृह विभाग गायब आहे. कायदा आणि सुव्यवस्था गायब आहे. त्यामुळे सीसीटीव्ही गायब झाले ही बातमी वाचून आश्चर्यही वाटत नाही. ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली तेथील संस्थाचालक गायब आहेत. हा संस्थाचालक गायब आहे की निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षाला अडचण नको म्हणून त्याला गायब करण्यात आले हा तपासाचा विषय आहे," असे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केले.
"पीडित व्यक्तीने तक्रार केली तर सर्व पुरावे पीडित व्यक्तीनेच गोळा करून पोलिसांना द्यावे अन्यथा न्याय मिळणार नाही असा गृहविभागाचा कारभार राज्यात सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज गायब करणारे, आरोपीला वाचवणाऱ्या या शाळेची मान्यता रद्द करणार का? संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना अटक कधी होणार? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेl. कारण सरकारने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे," असा घणाघाती प्रहार त्यांनी केला.