काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं आहे. "रशियामध्ये जे पुतीनने केलं ते आता मोदी सरकार भारतात करण्याच्या मार्गावर आहे. देश पूर्णतः हुकूमशाही पद्धतीने चालवावा हा निर्धार मोदी सरकारनी केला आहे" असं म्हणत वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"या देशात आता जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात लोकशाही जिवंत ठेवायची नाही, विरोधक संपवून टाकायचे. रशियामध्ये जे पुतीन करत आहेत... विरोधकच ठेवायचं नाही आणि दाखवायला लोकशाही ठेवायची. संविधानाचं वरचं पान बरोबर ठेवायचं आणि आतलं पूर्ण बदलायचं आणि संविधान शिल्लक आहे अशी अशी बोंब मारत राहायची" असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
"जनतेच्या मनात असलेल्या रोषाचा उद्रेक महाभयंकर होईल. आपल्या देशाचे स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही ज्या घटनेने लोकांना दिला आहे ते आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत जनतेच्या मनात असलेल्या रोषाचा उद्रेक महाभयंकर होईल. महाराष्ट्रातून मोदी सरकारच्या समाप्तीला सुरुवात होईल. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेची साथ मिळत आहे."
"मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळून आता जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. प्रकाश आंबेडकर काँग्रेसला सात जागेवर पाठिंबा देत असतील तर अकोलाच्या उमेदवारीच्या संदर्भात पुन्हा विचार व्हावा असा काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा विचार आहे. यावर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील" असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.