Congress Vijay Wadettiwar News: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत लढावे, अशी सर्वांची इच्छा होती. त्यादृष्टीने सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले. राज ठाकरे पूर्वी म्हणाले होते की, दोन देतो का? तीन देतो का? असे विचारायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही. मात्र, आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर म्हणायची वेळ आली आहे की, एक ते दोन जागांसाठी लोटांगण घालायला मी राज ठाकरे नाही, अशी खोचक टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार बोलत होते. राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार, अशा चर्चा आहेत. मात्र, जागावाटपाचे घोडे अद्यापही अडलेले आहे. राज ठाकरे यांना महायुतीतून दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डी यांपैकी जागा मिळू शकतात, अशी चर्चा होती. मात्र, दिल्लीतील बैठकीनंतर राज ठाकरे यांना मिळाली तर कदाचित एक जागा मिळू शकते किंवा एकही जागा मिळणार नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे. महायुतीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. मला एक तरी द्या हो. दोन तरी द्या हो, असे म्हणण्याची वेळ राज ठाकरेंवर आली आहे. अशी बाब प्रकाश आंबेडकर सहन करत नाहीत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
रामटेकची जागा काँग्रेस जिंकणार, समोर उमेदवार कोणीही असू दे
रामटेकची जागा काँग्रेस जिंकेल. मग समोर कोणताही उमेदवार असू दे. रामटेकचा निकाल धक्कादायक असेल. भाजपच्या अधःपतानाची सुरुवात महाराष्ट्रमधून होईल, असा घणाघात करताना, मी ओबीसीसाठी लढत आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जी काही जबाबदारी दिली, ती पार पाडली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जागा जिंकून देऊ, असा विश्वास हायकमांडला दिला आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यात की दिल्लीत माझी गरज असेल तर तसा निर्णय होईल
राज्यात की दिल्लीत माझी गरज असेल तर तसा निर्णय होईल. हायकमांडला अपेक्षित असा निर्णय होईल. विदर्भातील जागा घोषित केल्या आहेत. चंद्रपूरची जागा अजून बाकी असून, ती जागा शंभर टक्के जिंकणारी जागा आहे. पूर्वी काँग्रेसचा एक खासदार होता, आता २० खासदार निवडून येतील. त्याची सुरवात चंद्रपुरातून होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. चार जागांचा विचार करावा असे म्हणणे होते. आताच्या घडीला प्रकाश आंबेडकरांसारखे नेते दिसत नाहीत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देऊन उमेदवारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. शाहू-फुले-आंबेडकरचा वसा घेण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात सर्वांनी विचार करावा. नक्कीच त्यातून चांगले रिझल्ट मिळतील, अशी आशा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.