Congress Vikas Thackeray News: मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचेच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचे ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणाले. यानंतर आता महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, संजय राऊतांच्या भूमिकेचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे, असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे. यावर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी भाष्य केले.
संजय राऊत यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत; विकास ठाकरे काय म्हणाले?
पक्ष वाढीच्या संदर्भात त्यांचे जे विचार आहेत ते योग्यच आहे. कारण कार्यकर्त्यांची एक प्रकारे ओरड असते की, आम्हाला संधी मिळत नाही. यामुळे स्वबळावर लढल्यास बरे होईल. नागपूर जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. नागपूर शहराचा महापौर म्हणूनही काम केले आहे. अनेक वर्षापासून संघटनेचे काम करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे जे मत आहे ते वैयक्तिकरित्या आपल्यासमोर मांडले आहे, असे काँग्रेस नेते विकास ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनपा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय जर हा महाविकास आघाडीचा असेल तर तो सर्वांना मान्य असेल. परंतु, नागपूरमध्ये तरी काँग्रेस हा पक्ष सर्व निवडणुका स्वबळावर लढत आला आहे. काँग्रेस पक्षाला प्रत्येक बुथवर चांगले मतदान होत आले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर कुठली हरकत नाही. कार्यकर्त्यांबाबत संधी मिळत नसल्याच्या वक्तव्यावर सहमत आहे. ती खरी गोष्ट असून पक्ष वाढीसाठी या निवडणुका स्वबळावरच लढल्या पाहिजेत, असे विकास ठाकरे म्हणाले.