अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 07:04 AM2024-12-12T07:04:20+5:302024-12-12T07:04:50+5:30
गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. विजय वडेट्टीवार यांच्यावर ती जबाबदारी होती.
-कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेने दावा केला तर काँग्रेसतर्फे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार आहे. तशा हालचाली काँग्रेस नेत्यांनी सुरू केल्या असून या संबंधीचा तोंडी प्रस्तावही उद्धवसेनेकडे देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. विजय वडेट्टीवार यांच्यावर ती जबाबदारी होती. तर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा उद्धवसेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे होती. आता मविआतील कोणत्याही एका पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नाही.
विधानपरिषदेत कुणाचे किती संख्याबळ?
विधानपरिषदेत उद्धवसेनेचे सात व काँग्रेसचे सात सदस्य आहेत. शरद पवार गटाचे पाच सदस्य आहेत.
काँग्रेस व उद्धवसेनेचे संख्याबळ समान असल्यामुळे काँग्रेसने परिषदेवर आपला दावा सादर केला आहे.
अधिवेशनात निर्णय?
विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक अधिकार मिळवून देणारे पद आहे. हे पद ज्या पक्षाला मिळते अप्रत्यक्षपणे त्या पक्षालाही बळ मिळते.
त्यामुळेच काँग्रेस विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात एकट्या उद्धवसेनेला विरोधी पक्षनेतेपद सोपविण्यास तयार नाही. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनात यावर योग्य निर्णय होईल.