स्वयंसेवकांची आणीबाणी पेन्शन बंद करण्याचा काँग्रेसचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 02:44 AM2019-01-04T02:44:08+5:302019-01-04T02:44:18+5:30
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अवमान आहे.
मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अवमान आहे. केवळ संघ स्वयंसेवकांच्या फायद्यासाठी भाजपा सरकारकडून अशा योजना लागू केल्या जातात. त्यामुळे मध्य प्रदेशातील ही योजना बंद केल्याबद्दल कमलनाथ सरकारचे महाराष्ट्र काँग्रेसने अभिनंदन केले आहे. तसेच सरकार आल्यास महाराष्ट्रातील पेन्शन योजना बंद करण्याचाही इशारा गुरुवारी दिला.
मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, आणीबाणीची पेन्शन योजना म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला कमी लेखून संघाचे महत्त्व वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. मुळात ज्यांचे स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नाही अशी मंडळी आज देशभक्तीचा बाजार मांडून सहानुभूती मिळवण्याचा फुटकळ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जेव्हा अशा पेन्शन योजनेची घोषणा केली तेव्हा त्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला होता, असे सावंत म्हणाले.