मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला आपण दोघेही पाठिंबा देऊ असा प्रस्ताव काँग्रेसकडून आम्हाला होता, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. तो प्रस्ताव व्यवहार्य नसल्यामुळे आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, अशी पुस्तीही पवार यांनी जोडली. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आज येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कुठल्याही पक्षाकडे बहुमत नसल्याचे निकालाच्या दिवशी काँग्रसने वरील प्रस्ताव दिला होता, असा दावा पवार यांनी केला. काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने असा प्रस्ताव दिला होता, हे मात्र पवार यांनी सांगितले नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट कायम राहू नये अथवा फेरनिवडणुकीची पाळी येऊ नये म्हणून स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव हा राज्य पातळीवरील एका नेत्याकडून आलेला होता. पक्ष नेतृत्वाकडून नाही. तो प्रस्ताव व्यवहार्यदेखील नव्हता. आम्ही तो गांभीर्याने घेतला नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. आमच्या पक्षातील काही नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वाचवायचे असल्याने हा पाठिंबा दिला असल्याच्या चर्चेत काहीही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
काँग्रेसचा होता सेनेच्या पाठिंब्याचा प्रस्ताव
By admin | Published: October 21, 2014 3:40 AM