Maharashtra Congress ( Marathi News ) : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला पक्षातील आमदारांकडून दगाफटका सहन करावा लागला. काँग्रेसच्या सहा ते सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक मैदानात असलेले शेकाप नेते जयंत पाटील यांच्या पदरी पराभव पडला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही याबाबतचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर त्वरित कठोर कारवाई केली जाईल, असा दावा केला होता. मात्र आता काँग्रेसने भूमिका बदलत आमदारांचं लगेच निलंबन न करता विधानसभा निवडणुकीत सदर आमदारांना दणका देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं ताबोडतोब निलंबन न करता आगामी विधानसभा निवडणुकीत सदर आमदारांचं तिकीट पक्षाकडून कापलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांचा पत्ता कट होऊन त्यांच्या जागी पक्षाकडून नवे उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.
कारवाईची टांगती तलवार असलेले आमदार महायुतीच्या वाटेवर?
ज्या आमदारांवर काँग्रेसकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे, असे आमदार महायुतीतील पक्षांचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे.
जितेश अंतापूरकर हे सुरुवातीपासूनच अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे या आमदारांनी लगेच भाजप प्रवेश करणं टाळलं आणि ते काँग्रेससोबतच राहिले. मात्र विधानपरिषद निवडणुकीत या आमदारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेला आदेश डावलल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अंतापूरकर यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतल्याचं दिसत आहे.