मुंबई - गॅसच्या किंमती ७०० रुपयांनी वाढवून मोदी सरकारने आधी जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आणि आता २०० रुपये कमी करुन दिलासा देत असल्याचा ढोल बडवत आहेत, मोदी सरकारचा हा खोटारडेपणा या पत्रकार परिषदांमधून उघड केला जाणार आहे, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमिटरची भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर २०२३ रोजी एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर सर्व जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा काढून पहिला वर्धापन दिन साजरा करणार आहे. दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सर्व जिल्ह्यात प्रमुख नेते पत्रकार परिषदा घेऊन केंद्रातील मोदी सरकारने जनतेची कशी लुट केली याचा पर्दाफाश करणार आहेत.
२०१४ साली LPG गॅसची किंमत ४५० रुपये होती, ही वाढवून मागील ९ वर्षात ११५० रुपये केली व रक्षाबंधनच्या दिवशी २०० रुपयांनी कमी केली, मोदी सरकारची ही व्यापारी वृत्ती सर्वसामान्यांना लुटणारी आहे. गॅसच्या किंमती ७०० रुपयांनी वाढवून मोदी सरकारने आधी जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आणि आता २०० रुपये कमी करुन दिलासा देत असल्याचा ढोल बडवत आहेत, मोदी सरकारचा हा खोटारडेपणा या पत्रकार परिषदांमधून उघड केला जाणार आहे. पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत पदयात्रा काढली जाणार आहे व त्यानंतर ६ ते ७ या वेळेत जाहीर सभा घेतली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांवर जिल्हावार जबाबदारी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अहमदनगरमध्ये विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अकोलामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पुणे जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाणे जिल्ह्यात प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान, नाशिकमध्ये CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, औरंगाबादमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूरमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, जळगावमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपासून भारत जोडो यात्रेची सुरुवात केली जाणार आहे.