मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध मतदार संघात तेथील इच्छूकांसह विद्यमान आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदार संघाप्रमाणे मिळालेली आघाडी अनेक नेत्यांना धडकी भरविणार आहे. या आकडेवारीवरून नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. अकोला जिल्ह्यातील रिसोड मतदार संघात देखील काँग्रेससमोर असंच आव्हान आहे.
रिसोड मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अमित झनक या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत अमित झनक यांनी काँग्रेसची ही जागा कायम राखली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदार संघातील स्थिती बदलल्याचे दिसून येते. काँग्रेससमोर आता केवळ भाजपचं नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचं तगड आव्हान आहे.
लोकसभेला रिसोड विधानसभा मतदार संघात भाजपला मोठी आघाडी मिळाली. तर वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर दुसऱ्या स्थानी होते. तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी फेकले गेले. यामध्ये भाजपला ९५ हजार ७०७, वंचितला ४४ हजार ४०० आणि काँग्रेसला ३९ हजार ५८३ मते मिळाली. या मतदार संघात भाजपला मिळालेली मते काँग्रेस आणि वंचितची मते एकत्र केली तरी त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजपसाठी आगामी विधानसभा निवडणूक सुकर होण्याची शक्यता आहे.
रिसोड मतदार संघातून अमित झनक सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. परंतु, या आकडेवारीवर विधानसभेचं गणित जरी ठरलेली असली तरी अनेकदा विपरीत निकाल मिळतात. २०१४ लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला रिसोडमधून आघाडी मिळाली होती. परंतु, अमित झनक यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारली. परंतु, वंचित बहुजन आघाडीच्या उदयामुळे काँग्रेसला मतविभाजनाला सामोरे जावे लागणार आहे. एकूणच विधनासभेला काँग्रेससमोर केवळ भाजपच नव्हे तर वंचितचही तगड आव्हान आहे.