देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यातच, सध्या काँग्रेसह विरोधी पक्षातील बरेच नेते भाजप अथवा त्यांच्या मित्रपक्षांच्या वाटेवर जाताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी, राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या आणि मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार पडलं. याशिवाय, काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी, अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यानंतर आता, "मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना? असे सूचक विधान करत खूप जण येणार आहेत, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
काय म्हणाले मुनगंटीवार? -मुनगंटीवार म्हणाले, "दो से भले चार, यात वाईट काय? दुसऱ्या पक्षातील लोक आपल्या पक्षात आले तर शेवटी आपणच मोठे होतो. त्यामुळे मला वाटते की, हा प्रश्नच राहत नाही की, तुम्हाला काय गरज राहते? मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना? शेवटी प्रत्येकामध्ये काही गुण तर नक्कीच आहेत." यावर, येणार आहे का कुणी? असा प्रश्न विचारला असता, खूप जण येणार आहेत. येणार आहे का काय? तुम्ही रोज बघता, तरी विचारताय येणार आहे का कुणी? एवढी काय वाट बघताय तुम्ही? खूप जण येणार आहेत. फक्त आता अशोक चव्हाण आले आहेत, बाकी वेटिंगमध्ये येतील ते, काही अडचण नाही," असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते.
गिरीश महाजनांनीही केला होता दावा - "संजय निरुपम असतील, अनेक नेते आहेत, जे भाजपमध्ये असतील, आमच्या मित्र पक्षांत असतील, यायला उत्सुक आहेत. आगामी आठ-दहा दिवसांत आपल्याला हे चित्र बघायला मिळेल. अनेक मोठे नेते आमच्याकडे प्रवेश करतील. खरं म्हणजे आता या पक्षात रहायला कुणीही तयार नाही. यांचं राज्यावरचं नेतृत्व, यांचं देशावरचं नेतृत्व यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. म्हणूनच आता सर्वांनाच वाटतंय की, आपण मुख्य प्रवाहात यावं. मोदीजींच्यासोबत काम करावं. म्हणून अनेक दिग्गज नेते यापुढेही लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या पक्षामध्ये, आमच्या मित्र पक्षांमध्ये सहभागी होतील," असे गिरीश म्हजन यांनी म्हटले आहे.