मुंबई - मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत जाऊन शिक्कामोर्तब करून घ्यावं याची गरज का वाटली?. लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची समाधानकारक कामगिरी नव्हती. त्यांचेही समाधान झाले नसेल. त्यांच्या चूका काय झाल्या याचे आत्मपरिक्षण केले पाहिजे. जर आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू. उमेदवारी निवडीबाबत काय चूका झाल्या वैगेरे. त्यामुळे पुन्हा सावरण्यासाठी ते दिल्लीत गेले होते का, मला आश्चर्य वाटलं. कारण ती जे मागणी करतायेत ती होणार नाही असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंच्या चेहरा मविआकडून मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्यावर स्पष्ट मत व्यक्त केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा काँग्रेसनं महाराष्ट्रच नाही तर इतर ठिकाणीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नाही. ही परंपरा नाही. मुख्यमंत्री जर स्वत: निवडणुकीत उतरले तर सामान्यत: त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाते. मग अशोक गहलोत, कमलनाथ होते तेव्हा झाले. पण विरोधी पक्षात असताना अपवाद वगळता चेहरा दिला नाही ही परंपरा आहे. निवडणूक झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष जो असतो त्याचा मुख्यमंत्री होतो कारण ते सरकारच्या स्थैर्यासाठी महत्त्वाचा असतो. यावेळी बदल करायचं काही कारण वाटत नाही असं त्यांनी सांगितले. बोल भिडू या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयांवर परखड भाष्य केले.
तसेच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतची मागणी काँग्रेस पक्षात कुणी मान्य करणार नाही. त्याने आम्हाला काय फायदा मिळेल असं वाटत नाही. जो काही सहानुभूतीचा विषय होता तो आता संपला आहे. त्यातून किती फायदा झाला हे माहिती नाही. परंतु आता ज्या आमदारांनी पक्षांतर केले, ज्यांच्यावर खोक्यांचा आरोप झाला त्यांच्याबद्दल राग आहे. त्यांचे मतदार त्यांना विचारणार. आम्ही विश्वासाने तुम्हाला मत दिले, तुम्हाला आमदार केले आणि तुम्ही आमच्या विश्वासाचा सौदा केला याचे उत्तर त्या आमदारांना द्यावा लागेल. लोकसभेला हा मुद्दा नव्हता परंतु विधानसभेत वैयक्तिक आमदारांबद्दल प्रश्न निर्माण होणार आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा मुद्दा कधी नव्हता. काँग्रेस कधीच त्याला मान्यता देणार नाही. मागणी करायला हरकत नाही पण ते होणार नाही. लोकसभा निकालाच्या कामगिरीनंतर अशाप्रकारची मागणी करणेच आश्चर्यकारक आहे. का केली हे माहिती नाही. जागावाटपात एखादी जागा मागेपुढे होऊ शकते. एखाद्याचा आग्रह असतो, मागणी असते. लोकसभेला हट्टाने त्यांनी काही जागा मागून घेतल्या होत्या. यावेळी जागावाटपात फार मोठा फरक पडणार नाही. ४८ जागांमध्ये मोठा फरक दिसला परंतु २८८ जागांमध्ये फार फरक दिसेल असं वाटत नाही. काही जागांवर तडजोड होऊ शकते. एखाद्या जागेवर दिल्लीत जाऊन कुणी हट्ट पूर्ण करू शकेल. सत्ता येताना आपल्याला दिसतेय. त्यामुळे भरलेल्या ताटाला कुणी लाथ मारेल असं वाटत नाही असं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी मविआत मतभेद होण्याची शक्यता कमी आहे असे संकेत दिले.