Maharashtra Congress ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. सत्ताधारी महायुतीने शेवटच्या टप्प्यात लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावलेला असताना आता काँग्रेसकडूनही निवडणूक जाहीरनाम्यातून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा बनवण्याचं काम सुरू असून या जाहीरनाम्यात सर्वसामान्य जनतेला भुरळ घालणाऱ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यासाठी महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली जाऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा २ हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात येईल. तसंच तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी बेरोजगार भत्ता देण्याची घोषणाही काँग्रेसकडून होऊ शकते. या योजनेतून बेरोजगार तरुणांना प्रतिमहिना ४ हजार रुपये देण्याचं आश्वासन काँग्रेसकडून दिलं जाऊ शकतं.
शेतकऱ्यांनाही दिलं जाऊ शकतं मोठं आश्वासन
मागील काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी काँग्रेसकडून कृषी समृद्धी योजना आणली जाऊ शकते. या योजनेतून शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्याचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या बैठकांचा धडाका
राज्यातील काँग्रेस नेते आज तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक बोलवली आहे. या बैठकीत निवडणूक तयारीसह जाहीरनाम्याबद्दल चर्चा होत असल्याचे समजते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.