काँग्रेस घेणार दुष्काळाचा आढावा; औरंगाबादमध्ये १३ तारखेला बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:13 AM2018-10-12T01:13:26+5:302018-10-12T01:14:21+5:30
दुष्काळी परिस्थिती, राष्ट्रवादीसोबत जागावाटप आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या वेळी आगामी जनसंघर्ष यात्रा आणि दुष्काळी दौरा एकत्रितपणे करण्याचा निर्णय झाला.
मुंबई : मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने औरंगाबाद येथे १३ तारखेला बैठक घेणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना बोलावून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थिती, राष्ट्रवादीसोबत जागावाटप आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या वेळी आगामी जनसंघर्ष यात्रा आणि दुष्काळी दौरा एकत्रितपणे करण्याचा निर्णय झाला. औरंगाबाद येथे १३ आॅक्टोबरला होणाऱ्या बैठकीत दुष्काळाचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात येईल. या बैठकीस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते तर मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
जागावाटपावरून बैठक वादळी
जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चढाओढ सुरू आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने शुक्रवारी आघाडीबाबत होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत विचारले असता, सध्या आमची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीसोबतही चर्चा करू. अद्याप दोन्ही पक्षांत जागावाटपाची चर्चा झाली नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.