मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यापूर्वी राजकीय पक्षांकडून राज्यभर यात्रा काढल्या जात आहे. भाजपची महाजनादेश,शिवसेनेची जन आशीर्वाद व राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेनंतर आजपासून काँग्रेसच्या 'महापर्दाफाश' यात्रेला प्रारंभ होत आहे. त्याधीच काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षावर सोशल वार करण्यात येत आहे. पोरांच्या केला कामाचा वांदा आणि यांचा फक्त जाहिरातीचा धंदा अशी टीका काँग्रेसच्या सोशल मिडिया हैंडलवरून करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पहायला मिळत आहे. आजपासून सुरु होत असलेल्या 'महापर्दाफाश' यात्रेच्या आधी काँग्रेसने सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील तरुणांना रोजगार मिळत नाही. बेरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र हे सरकार फक्त खोट्या जाहिरात देण्यातच मग्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला आता काँग्रेसने उत्तर देण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री यांनी महाजनादेश यात्रेत ज्या-ज्या ठिकाणी सभा घेऊन भाषण केले, त्या प्रत्येक ठिकाणी महापर्दाफाश सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.