महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:43 PM2019-08-15T14:43:50+5:302019-08-15T14:45:48+5:30
२० ऑगस्टपासून काँग्रेसच्या यात्रेला सुरुवात होणार
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री करत असलेले दावे खोडून काढण्यासाठी काँग्रेसकडून पोलखोल यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या यात्रेदरम्यान अवास्तव आकडेवारीसह खोटे दावे करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांना काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रेतून प्रत्युत्तर देईल, असं पटोले म्हणाले.
१ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या मोझरीमधून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांची माहिती जनतेला देण्यासाठी भाजपाकडून ही यात्रा काढण्यात आली. मात्र महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री करत असलेले दावे खोटे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. विरोधकांनी विकासकामांवरुन आपल्यासोबत उघड चर्चा करावी, असं आव्हान फडणवीसांनी दिलं. आम्ही त्यांनी वेळ आणि ठिकाण दिलं. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही, असा दावा पटोलेंनी केला.
२० ऑगस्टला राजीव गांधींची जयंती आहे. तेव्हापासून काँग्रेसच्या पोलखोल यात्रेला सुरुवात होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांची यात्रा ज्या मार्गावरुन गेली, त्याच मार्गावरुन काँग्रेसची यात्रा जाईल. फडणवीसांनी केलेल्या दाव्यांची पोलखोल यात्रेतून करण्यात येईल, अशी माहिती पटोलेंनी दिली. 'गेल्या पाच वर्षांत राज्याचा दुप्पट विकास केल्याचा फडणवीसांचा दावा आहे. तब्बल ८ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आणल्याचं ते सांगतात. त्यांच्या या दाव्यांमधील फोलपणा आम्ही जनतेसमोर आणू,' असं पटोले म्हणाले.