शिर्डी : नारायण राणेंशी आता आमचा संबंध नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांचे भवितव्य साईबाबांच्या हाती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांच्याविषयी मत व्यक्त केले.शनिवारी साईदर्शनासाठी आलेले चव्हाण म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसला उत्तम वातावरण आहे. राहुल गांधींना चांगला प्रतिसाद मिळत आहे़ संसदेचे अधिवेशन पुढे ढकलून पंतप्रधान विधानसभेसाठी ५०पेक्षा अधिक सभा घेतात, यावरून भाजपाला घाम फुटल्याचे दिसते. देशातील अनेक पोटनिवडणुका, राज्यातील महापालिका, ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळत आहे.काँग्रेसला गुजरातमध्ये बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला़ केंद्र व राज्य सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सामान्य जनता, व्यापारी नाडला जात आहे़ शेतकºयांचे प्रश्न गंभीर झाले आहेत़ अत्यंत स्फोटक वातावरण असून काँग्रेस चांगली होती, असे लोकांना आता वाटत आहे. कर्जमाफीबाबत तारीख पे तारीख सुरू आहे. अगोदर सरकारने फसवे आकडे जाहीर केले होते़ आता सरकार प्रत्यक्षात आकडाही सांगू शकत नाही़ खड्डे बुजविण्याप्रमाणेच कर्जमाफीच्याही तारखांवर तारखा सुरू आहेत, असे चव्हाण म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के आदींची उपस्थिती होती़साखर कारखानदारीत विनाकारण हस्तक्षेपसाखर कारखानदारीत एफआरपीचा सत्तर-तीसचा फॉर्म्युला ठरला असतानाही सरकार विनाकारण हस्तक्षेप करून कारखानदारी अडचणीत आणत आहे. सरकारला यशवंतराव चव्हाणांची आठवण झाली, ही आनंदाची बाब आहे. मात्र सरकार चव्हाणांचे नाव घेत असेल तर त्यांना साजेसे काम करावे, असा टोमणा त्यांनी मारला़विधान परिषदेबाबत आज निर्णयविधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. रविवारी अंतिम निर्णय होईल़ या निवडणुकीत शिवसेनेने आमच्याबरोबर यायचे की नाही, ते त्यांनीच ठरवावे. शिवसेना मंत्रिमंडळात समृद्धी मार्गाला पाठिंबा देते व बाहेर विरोध करते ही दुटप्पी भूमिका आता जनतेच्या लक्षात येत असल्याचे ते म्हणाले़
गुजरातमध्ये काँग्रेस जिंकेल; राणेंचे भवितव्य आता साईबाबांच्या हाती - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 3:05 AM