Sharad Ponkshe: “याचा करेक्ट कार्यक्रम लावीन”; शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ विधानावरुन काँग्रेस नेत्या संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:45 PM2022-08-17T12:45:11+5:302022-08-17T12:46:18+5:30
शरद पोंक्षे यांनी पुन्हा असे विधान केले तर तोंडाला काळे फासू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आपल्या आक्रमक भाषण शैलीवरून चर्चेत आहेत. मात्र, शरद पोंक्षे यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या महिल्या प्रदेशाध्यक्षांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, याचा करेक्ट कार्यक्रम लावीन, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील कार्यक्रमात अहिंसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकांची झोड उठली आहे. हिंदू समाज अहिंसक होता, नपुंसक कधी झाला समजलच नाही. आम्हाला राग येत नाही, चीड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवलाच नाही. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळाले, हे आम्हाला खरे वाटते, पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, त्यांचा हा घोर अपमान आहे, असे शरद पोंक्षे म्हणाले होते. काँग्रेस नेत्यांनी याविरोधात टीका केली आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संगीता तिवारी यांनी तर पोंक्षे यांच्यावर सडकून हल्लाबोल केला आहे.
मी याचा करेक्ट कार्यक्रम लावीन
शरद पोंक्षे नावाचा कुणीतरी अभिनेता आहे. तो स्वतःला मोठा नेता समजू लागला आहे. पण तो नेता नाही तो आतंकवादी आहे. नथुरामाची औलाद आहे. पण हा या भाषणात सांगतोय, अहिंसेचे डोस देऊन हिंदुंमध्ये नपुंसकता आली आहे. नपुंसकता हिंदुंमध्ये वाढलेली आहे. मी खरच याचा करेक्ट कार्यक्रम लावीन, असा थेट इशाराच संगीता तिवारी यांनी दिला आहे.
दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी सातत्याने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. तर आता थेट हिंदु नपुंसक असल्याचे म्हटलेय. पुन्हा असे विधान केले तर तोंडाला काळे फासू, असा इशारा काँग्रेस कमिटीचे विशाल गुंड यांनी दिला. शरद पोंक्षे यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली आहे.