मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कारकीर्दीतील घडामोडींवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची जबाबदारी राणेंकडे देण्यात आली होती. हा प्रयत्न फसल्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या वादावर खरी ठिणगी पडल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
एबीपी माझाकडे या आत्मचरित्राची काही पाने उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केलेल्या दाव्यानुसार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या आताच्या परिस्थितीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना जबाबदार धरले आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानं जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. पद्धतशीरपणे त्यांनी विरोधी नेत्यासाठी सुभाष देसाईंचं नाव पुढे केलं, असा आरोप राणे यांनी केला आहे.
तसेच 1999 मध्ये विलासराव देशमुखांचे सरकार पाडण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादीचे आमदार मातोश्री क्लबवर आले होते. तेथे उद्धव ठाकरे आले होते. तेथे त्यांना राणे नसल्याचे सांगण्यात आले. बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या भेटीनंतर ही योजना वेगळ्या वळणावर गेली. विलासरावांनी बहुमत सिद्ध केले. मात्र, यानंतर उद्धव ठाकरे आणि राणे यांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा राणे यांनी यामध्ये केला आहे.
...तेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी; नारायण राणेंचा आत्मचरित्रात गौप्यस्फोट