Congress Yashomati Thakur Manipur Violence: दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना मणिपूरमध्ये घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यातच विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला जात असून, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. पीएम मोदींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील घटनेची स्वतःहून दखल घेतली आणि राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर आता विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
PM मोदी २ महिने काहीच बोलले नाहीत
मणिपूरमध्ये जे घडले ते अत्यंत वेदनादायी आहे. मागील ७७ दिवसांपासून सर्वकाही लपून ठेवले गेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार बेशरम आहे. हे हैवानांचे राज्य आहे. पंतप्रधान मोदी दोन महिने बोलले नाहीत, जेव्हा महिलांवर अत्यावर झाले, तेव्हा महाभारत झाले, तेव्हा बोलले. हे लक्षात ठेवावे. आता सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
दरम्यान, महिला अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अशा अनेक घटना इथे घडल्या आहेत, अशी धक्कादायक कबुली मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिल्यामुळे मणिपूरमध्ये किती भीषण परिस्थिती निर्माण झाली, याबाबत चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.