Yashomati Thakur : "कुटुंबप्रमुख आजारी पडला तर लाथ मारून निघून जाल का?"; यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:23 PM2022-06-25T13:23:52+5:302022-06-25T13:31:19+5:30

Congress Yashomati Thakur And Eknath Shinde : "सत्तेतील लोकांनी जनसेवेसाठी सत्तेचा वापर करायचा असतो मात्र या सर्व स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे."

Congress Yashomati Thakur Slams Eknath Shinde Over Uddhav Thackeray and shivsena | Yashomati Thakur : "कुटुंबप्रमुख आजारी पडला तर लाथ मारून निघून जाल का?"; यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल

Yashomati Thakur : "कुटुंबप्रमुख आजारी पडला तर लाथ मारून निघून जाल का?"; यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल

मुंबई - राज्यात सुरू असलेल्या सध्याचा सत्ता संघर्ष हा अतिशय धक्कादायक आणि व्यथित करणारा आहे. सत्तेतील लोकांनी जनसेवेसाठी सत्तेचा वापर करायचा असतो मात्र या सर्व स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर (Congress Yashomati Thakur) यांनी व्यक्त केली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात किंबहुना अख्ख्या देशात जे नाट्य सुरू आहे ते फक्त सत्ता काबीज करण्यासाठी सुरू आहे. सत्ता हिसकावून घेण्यासाठी सुरू आहे. सत्तेचा उपयोग सेवेसाठी करताना आपल्याला भरपूर वेळ तो सेवेसाठी होत नसल्याचं दिसतं. पण काही गोष्टी त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी होतं आहेत. जे लोक केंद्रामध्ये सत्तेत आहेत त्यांचा तर हा अट्टाहास असतो की, काहीही झालं तरी सर्व सत्ता आपल्या हातात आली पाहिजे. मग कोरोना किंवा महामारी असो. आता तर आसाममध्ये अनेक ठिकाणी पूर आला आहे. त्या ठिकाणी घरोघरी पाणी घुसलेले आहे. असं सगळं असताना आपण महाराष्ट्रामध्ये जे काही बघत आहे ते सर्वांसाठीच धक्कादायक आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.   

आम्ही अस्वस्थ आहोत. चार दिवस झाले आपण अजून आपल्या मतदारसंघात जाऊ शकलो नाही. सेवा ही तर आम्ही करतच राहणार. सत्ता राहिली, नाही राहिली तरी फरक पडत नाही. सेवेसाठी आमचा जन्म आहे आणि सेवा आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार. या मातीचं कर्ज आपल्यावर आहे. त्या मातीचे कर्ज फेडण्यासाठी आम्ही सातत्याने राबत राहणार. सर्व सामान्यांपर्यंत पोहोचत राहणार. जे काही करू शकतो ते आम्ही करतच राहणार. आणि या गोष्टी करण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्र सरकारवर नोटबंदी किंवा मग आपल्या देशावर आलेले आर्थिक संकट असेल त्यानंतर महामारी असेल या गोष्टींचा विचार जे लोक सत्तेसाठी हपापलेली आहेत ती अजिबात करत नाहीत हे आपण बघत आहे. कधीकधी मन अस्वस्थ होतं की, आपण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये लोकशाहीचे पालन करू शकत आहोत की नाही? लोकशाही जपू शकतो आहोत की नाही?  दिल्लीमध्ये तुम्ही पाहिले असेल सन्माननीय राहुलजी गांधी, सन्माननीय सोनियाजी गांधी यांना कशाप्रकारे छळले जात आहे. EDचे संकट एका ठिकाणी, संकट काय म्हणावं याला धाड म्हणावी लागेल. आज आसाममध्ये गेलेले आमचे काही सहकारी आहेत ते अर्ध्याला अधिक ED ला घाबरून गेले आहेत. म्हणजे या लोकांनी सत्तेत पायउलट केले की ते एकदम पवित्र होणार. त्यांच्यावरील ED चे आरोप सर्व नष्ट होणार. ते सर्व स्वच्छ होणार आणि मग सत्तेमध्ये भाजपासोबत सामील होणार. म्हणजे सत्तेचा उपयोग की गैरउपयोग हे आता आपणच ठरवायचं आहे. आमचे जे काही सहकारी आसाममध्ये मजा करत आहेत. त्यांच्या मतदारसंघांमध्ये, त्यांच्या परिवारामध्ये ज्यांना आपण दैवत मानलं त्यांच्याच पाठीत तुम्ही खंजीर खुपसून एका मिनिटात निघून गेला याचा एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून, काँग्रेसची कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच आश्चर्य वाटतं. सन्माननीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी व माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्यांना कुटुंबाप्रमाणे सांभाळलं. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. पण आज जर आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरातील कुटुंब प्रमुख आजारी पडला तर तुम्ही लोकं काय लाथ मारून निघून जालं? पाठीत खंजीर घालून निघून जालं? हे आम्हाला कधीच वाटलं नाही. 

माझं म्हणणं आहे सगळ्यांना की, हे सर्व करण्यासाठी आपण राजकारणात नाही आहोत. आपली अनेक लोक आहेत, आपली माणसे आहेत त्यांना आपल्याला जपायचे आहे. राजकारणामध्ये आपण ही महाविकासआघाडी यासाठी बनवली होती कारण आपल्याला एक वेगळी शक्ती जी जातीयवादी आहे ती शक्ती आपल्याला दूर ठेवायची होती. तुम्ही मागचे पाच वर्ष आठवा. बघा तुमची काय हालत झाली होती. एक मिनिटासाठी थांबा आणि आठवा. पदोपदी तुमच्या लोकांचा अपमान झाला होता की नव्हता? तरी पण तुम्ही हेच करत आहात? तुम्हाला जे करायच आहे ते तुम्ही करा. खऱ्या अर्थानं समाजकार्य करणारी मंडळी अजिबात असं वागणार नाहीत असं मला वाटतं. अस ॲड. ठाकूर म्हणाल्या.
 

Web Title: Congress Yashomati Thakur Slams Eknath Shinde Over Uddhav Thackeray and shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.