Gulabrao Patil ( Marathi News ) : राज्यात आज दसऱ्यानिमित्त राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे, मुंबईत शिवाजी पार्कवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा होणार असून शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. या मेळाव्यावरुन दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सकाळी खासदार संजय राऊत यांनी आधी शिंदे गटावर टीका केली, या टीकेला आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
"आमचे मुख्यमंत्री १८-१८ तास काम करतात. आतापर्यंत ते जळगावला १९ वेळा आले आहेत. त्यामुळे विरोधक विरोध करतात. शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादी मिक्स विचार आहेत. तिकडे फक्त चांदी मिक्स विचार असणार आहेत. जमलेल्या तमाम राष्ट्रभक्तांनो म्हणतील बाकीचे शब्द ते विसरले आहेत. आमचे इकडे हिंदूत्वाचे विचार असणार आहेत, असा पलटवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
"बाळासाहेबांच्या विचारांचे जे सोनं आम्ही लुटायचो ते फक्त इकडेच मिळणार आहे. तिकडे चांदी मिक्स विचार असणार आहेत, असंही पाटील म्हणाले. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर होत असते. आता लोक काम करणाऱ्याच्या मागे असतात. त्यामुळे आता महायुतीच्या मागे लोक असणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आमचेच सरकार येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. राऊत साहेब यांची स्टाईल बघा आज, स्वत:ला बाळासाहेब समजत आहेत. उद्धव ठाकरे यांना उलट-सुलट सांगून त्यांनी राज्यात सगळ वाटोळ केलं आहे, असा टोलाही संजय राऊत यांना पाटील यांनी लगावला.
संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
"या देशात ५० वर्षापेक्षा अधिक काळ एकच दसरा मेळावा होतो, जिथे विचारांचं सानं लुटलं जातं. तो म्हणजे शितीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा. माझ्या माहिती प्रमाणे देशात दोन मेळावे होतात, एक नागपूरात आरएसएसचा आणि मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा. तो परंपरेनुसार आज होईल. आता मेळाव्याची लाट आली आहे, प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात मेळावे करतात, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
"प्रत्येक दसऱ्याला विचारांचं सोनं बाळासाहेब ठाकरे देशाला आणि महाराष्ट्राला देत राहिले. आता तिच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवली आहे. तुम्ही भले पक्षाचं चिन्ह नाव चोरले असेल तरीही विचार , जनता ही मुळ शिवसेनेसोबत आहे. निवडणूक आयोग शिवसेना कोणाची हे ठरवू शकत नाही. या राज्यातील जनतेने हा निर्णय घेतला आहे. आजचा दसरा मेळावा हा विधानसभेच्या दृष्टीने ऐतिहासिक असणार आहे. आज एक दिशा महाराष्ट्राला लाभेल, असंही संजय राऊत म्हणाले.