पुणे : महाविकास आघाडीतून काँग्रेसने बाहेर पडावे या मागणीसाठी काँग्रेसचेच कार्यकर्ते, पदाधिकारी आता आक्रमक होऊ लागले आहेत. आळंदी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी तर जाहीरपणे काँग्रेसवर हल्ला बोल.केला असून १५ऑगस्टला पक्षाच्या विरोधात ऊपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
वडगावकर लोकमत बरोबर बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीत पक्षाची फसवणूक होत आहे. राज्यातील जनतेला पक्षाच्याच मंत्र्यांनी वार्यावर सोडले आहे. कोरोना टाळेबंदीमुळे जनता त्रस्त झाली असताना त्यांना हजारो रूपयांची वीज बीले पाठवली जातात. ती बरोबरच असल्याची दर्पोक्ती केली जाते.
शाळा बंद आहेत, पण ऑन लाईन शिक्षण सुरू करून शिक्षण संस्थांनी त्याच्या खर्चाचा बोजा पालकांवर टाकण्यास सुरूवात केली आहे. शाळेचे शुल्क वाढवून मागितले जात आहे. दिले नाही तर कारवाई म्हणजे मूलाला शाळेतून काढून.टाकण्यास सांगितले जात आहे.
या सर्व गोष्टींच्या विरोधात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांंना पत्र लिहिली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना लिहिले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही निवेदन पाठवले. कोणीही दखल घेतली नाही. सरकारमध्ये काँग्रेसचे काहीही चालत नाही. जनतेची कामे होत नसतील तर अशा सरकारमध्ये पक्षाने रहावे तरी कशाला या भूमिकेत आपण आलो असल्याचे वडगावकर म्हणाले.
पक्षाला जाग यावी म्हणून १५ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ऊपोषण करणार असल्याचे वडगावकर यांनी सांगितले. आळंदीतील तसेच अन्य पक्ष कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपली भूमिका विषद करणारे पत्र पाठवले आहे. ऊपोषण आळंदी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार असून त्यात शहर सचिव संदिप नाइकरे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगीराज सातपुते हेही सहभागी होणार असल्याचे वडगावकर यांनी सांगितले.