नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करीत काँग्रेसने मंगळवारी नागपूर दणाणून सोडले. लाखोच्या संख्येने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. सरकार नुसतेच चर्चा आणि घोषणांमध्ये अडकले आहे. आता वेळ कृतीची आहे. जर कर्जमाफी झाली नाही, तर यापेक्षाही कठोर पाऊल काँग्रेस उचलेल, असा इशाराही या मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेसने दिला. अभुतपूर्व अशा या मोर्चाने काँग्रेस नेत्यांमध्ये नवा उत्साह संचारला, तर सत्ताधारी पक्षाचे नेते अचंबित झाले.दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, हमीभावात न केलेली वाढ, महागाई आदी समस्या सोडविण्यासाठी भाजपा-सेनेच्या युती सरकारने गेल्या वर्षभरात काहीच केले नाही, असा आरोप करीत काँग्रेसने मंगळवारी विराट मोर्चा काढत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक दिली. या मोर्चाने सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून, सत्ताधाऱ्यांमध्ये मोर्चा आणि त्याच्या गर्दीची दिवसभर चर्चा होती.मोर्चाचे स्वरूप एवढे विराट होते की मोर्चाचे एक टोक टी-पॉइंट चौकात तर दुसरे टोक दीक्षाभूमी परिसरात होते. हे अंतर सुमारे २ किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे पसिरातील वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने धानाच्या पेंड्या, संत्रा, मका व कापसाच्या बोंडाच्या माळा घालून सहभागी झाले होते.माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी परिसरातून हा मोर्चा निघाला. मोर्चात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, उपनेते आ. विजय वडेट्टीवार, खा. अविनाश पांडे, माजी खा. विलास मुत्तेमवार, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नितीन राऊत, अनीस अहमद, सतीश चतुर्वेदी, नसीम खान, वर्षा गायकवाड, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम, आ. यशोमती ठाकूर, सुनील केदार, विरेंद्र जगताप, राजेंद्र मुळक यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रमुख नेतेमंडळी एका ट्रकवर स्वार होऊन मोर्चात सहभागी झाली, तर बहुतांश आमदार व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह पायी चालत काँग्रेसचा झेंडा उंचावला. ढोलताशांचा निनाद व सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमला. (प्रतिनिधी)> मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा मोर्चानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. अधिवेशन सुरू असल्याने आता निर्णय जाहीर करता येणार नाही. विधिमंडळात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस पुढचे पाऊल उचलेल, असा इशारा अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला. मोर्चात २ लाख लोक सहभागी झाल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. > शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य शासन चर्चेला तयार असताना विरोधी पक्षांनी पहिले कृती, मगच चर्चा असा आक्रमक पवित्रा घेतला. अगोदर कर्जमाफीची घोषणा करा, अशी आग्रही भूमिका घेत मंगळवारी विरोधी पक्षांनी विधान परिषदेत गोंधळ घातला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणे सभागृहात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे कामकाज सुरुवातीला दोनवेळा व अखेर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. > युती सरकार काही करेल, अशी लोकांना आशा होती. वर्षभर वाट पाहिली, मात्र काहीच झाले नाही. यांचा खोटारडेपणा उघड झाला. त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक मोर्चात सहभागी झाले. ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत, तर सरकारविरुद्ध जनतेचा एल्गार आहे. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस > शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला सरकारला वेळ नाही. पोकळ घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात आहे. आता घोषणा नको तर कर्जमाफी हवी. तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री > हे फेकू अन् थापा मारणारे सरकार आहे. दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. विरोधी पक्षात असताना सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हे सरकार सत्तेवर आल्यापासून ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या मागणीप्रमाणे या सरकारवरही ३०२चा गुन्हा दाखल करा. - नारायण राणे, माजी मुख्यमंत्री
काँग्रेसचा एल्गार!
By admin | Published: December 09, 2015 1:39 AM