मुंबई : ‘काँग्रेस दर्शन’ या मुखपत्रातील वादग्रस्त लेखानंतर मुंबई काँग्रेसमध्ये उफाळून आलेली गटबाजी सुरूच आहे. मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना लक्ष्य करणाऱ्या गुरुदास कामत गटाने शनिवारी रात्री ‘डिनर पार्टी’चे आयोजन केले आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून निरुपम गटाने खास उत्तर भारतीय ‘भोज’चे निमंत्रण आपल्या समर्थकांना दिले आहे. नववर्षानिमित्त गुरुदास कामत यांनी शनिवार, ९ जानेवारी रोजी निमंत्रितांना रात्रभोजनाचे निमंत्रण धाडले आहे. अंधेरी येथील या भोजनाच्या माध्यमातून निरुपमविरोधी कारवायांना गती देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. कामत गटाकडून रात्री भोजनाची तयारी चालू असतानाच संजय निरुपम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुंबई काँग्रेसचे सचिव विश्वबंधू राय यांनी अंधेरी पश्चिमेत खास उत्तर भारतीय ‘भोज’चे आयोजन केले आहे. उत्तर भारतीयांमध्ये खास लोकप्रिय असणाऱ्या आणि थंडीच्या दिवसात बनविल्या जाणाऱ्या ‘लिट्टी-चोखा’ या खास पदार्थाचे आमंत्रण देण्यात आले आहे. उत्तर भारतीयांसाठी हिवाळ्यातील लिट्टी-चोखाचे खास स्थान असून, त्यानिमित्ताने उत्तर भारतीयांना साद घालण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस दर्शन या मासिकात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले. काँग्रेस स्थापना दिनीच हे प्रकरण बाहेर आल्याने पक्षात आणि पक्षाबाहेर जोरदार पडसाद उमटले. काँग्रेस पक्षात राहून विरोधकांची विचारधारा पोसली जात असल्याचा आरोप करत कामत गटाने निरुपम यांच्यावर निशाणा साधला. आमदार नसीम खान यांनी तर थेट निरुपम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुखपत्रातील वैचारिक गोंधळामुळे संजय निरुपम बॅकफुटवर गेल्याचे चित्र असून, पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.
काँग्रेसचे ‘गटबाजी’दर्शन!
By admin | Published: January 09, 2016 2:54 AM