ठाणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता कॉंग्रेसने आपली जम्बो कार्यकारणी जाहीर करुन गटातटामध्ये विखुरलेल्या कॉंग्रेसला एकसंधा करण्याचा प्रयत्न केला आहे. या जम्बो कार्यकारणीत सर्व सेलच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून तब्बल ४६ उपाध्यक्ष, ४७ सरचिटणीस, ५४ चिटणीस आणि २६ कार्यकारणी सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही जम्बो कार्यकारणी जाहीर करत असतांना पक्षातील जेष्ठांना मात्र केवळ निमंत्रीतांमध्येच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हे निमंत्रीत या कार्यकारणीच्या विरोधात जातील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.मागील कित्येक महिने रिक्त असलेल्या कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी मनोज शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी आता आपली जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. ही कार्यकारणी सर्व समावेश असून तरुणांसह, निष्ठांवतांना आणि नवख्यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भविष्यातील गटातटाच्या अंतर्गत राजकारण शह देण्यासाठी, ही कार्यकारणी महत्वाची मानली जात आहे. ही निवड करतांना खुला, ओबीसी, एससी, मुस्लिम असे प्रवर्ग करण्यात आले असून त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ४६ उपाध्यक्ष, ४७ सरचिटणीस, ५४ चिटणीस, २६ सदस्यांचा समावेश आहे. तसेच सल्लागरपदी १५, आणि कायम निमंत्रीतांच्या यादीत १९ जणांचा समावेश करण्यात आला आहे. तर १२ ब्लॉक अध्यक्षांचीही निवड करण्यात आली असून पाच प्रवक्तेही नेमण्यात आले आहेत. दरम्यान मागील काही वर्षे आपले वजन वापरु काही प्रमाणात सत्तेची गणिते ठरविणाऱ्या जेष्ठांना मात्र या डावलण्यात आले आहे. >कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी मनोज शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपली जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. ही कार्यकारणी सर्व समावेशक असून तरुणांसह, निष्ठांवतांना आणि नवख्यांनाही संधी मिळाली आहे. मात्र, ज्येष्ठांना डावलल्याने ही जेष्ठ मंडळी निवडणुकीच्या काळात कशी खेळी करतात, याकडे लक्ष राहणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची जम्बो कार्यकारणी
By admin | Published: August 03, 2016 3:22 AM