भाईंदर - राज्य निवडणुक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदार संघ १४५ मधील याद्यांत मोठ्याप्रमाणात घोळ असुन त्यात तब्बल १०५५८ मतदारांची नावे दोनदा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या याद्यांतील घोळावर मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने आक्षेप घेतला असुन केलेला घोळ सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले.
मतदार नोंदणीत नेहमीप्रमाणे यंदाही घोळ झाल्याचे दिसून आल्याने येत्या निवडणुकांत मोठ्याप्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुक आयोगाने १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या केवळ मीरा-भार्इंदर मतदार संघातच १०५८८ मतदारांची नावे दोनदा नोंदविण्यात आली असुन अनेक मतदारांची केवळ नावेच नोंदविण्यात आली आहेत. त्यांचे पत्ते मतदार याद्यांतून गायब करण्यात आले असुन अनेक मतदारांची ओळख पटण्यासाठी त्यांच्या नावांपुढे त्यांचे छायाचित्रच प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. एकाच इमारतींतील मतदारांना वेगवेगळ्या याद्यांत विभागण्यात आल्याने अधिकृत मतदारांच्या नावांचा गैरफायदा बोगस मतदानासाठी होण्याची शक्यता सावंत यांनी वर्तविली आहे.अशा या याद्यांतील घोळामुळे बोगस मतदानाला चालना देण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली तर होत नाही ना, असा संशय सावंत यांनी व्यक्त केला आहे. गेल्या पालिका निवडणुकीतही सुमारे १० हजारांहून अधिक बोगस नावे नोंदविण्यात आली होती. ती नावे काँग्रेसनेच शोधून निवडणुक अधिकाऱ्यांना वगळायला लावल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सत्ताधाऱ्यांच्या काळातच असे घोळ मोठ्याप्रमाणात होत असल्याचा आरोप सावंत यांनी करुन त्यावर निवडणुक आयोगातील सक्षम अधिकाऱ्यांचे नियंत्रण ठेवले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घोळयुक्त याद्यांवर मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने तीव्र आक्षेप घेत ती सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी भोईर यांना दिले आहे. यावेळी नगरसेविका रुबीना शेख, माजी नगरसेवक अॅड. एस. ए. खान उपस्थित होते.