अमरावती - भाजप सरकारच्या गत तीन वर्षांतील अपयशाच्या वाटचालीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारला दाखविण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी सांयन्सस्कोअर मैदानावर अमरावती विभागीय जनआक्रोश मेळावा काँग्रेसच्यावतीने आयोजित केल्याची माहिती विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी रविवारी येथे दिली.या मेळाव्याला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अन्य नेते उपस्थित राहतील, असे ठाकरे यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येऊन ३१ आॅक्टोबर रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या तीन वर्षांच्या कार्यकाळात भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. शेतमालाला अल्प भाव, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतकºयांची कर्जमाफीच्या नावावर केलेली फसवणूक, जीएसटीमुळे नाराज असलेला व्यापारी वर्ग भाजप सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे जनसामान्यांना संकटातून सावरण्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेसने ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारविरुद्ध वाढलेला जनआक्रोश शासनदरबारी मांडण्यासाठी काँग्रेसने अमरावतीत विभागीय जनआक्रोश मेळावा घेण्याचे ठरविले आहे. या मेळाव्यात शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, कापसाला ७ हजार रूपये भाव, सोयाबीनला ५ हजार रूपये भाव व नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या शासनाकडे या मेळाव्यातून केल्या जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मेळाव्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आ. वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, राहुल बोंद्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष किशोर बोरकर, श्याम उमाळकर, मदन भरगड, बंडू सावरबांधे, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, प्रकाश साबळे, नितीन गोंडाणे, केवलराम काळे व पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारविरुद्ध काँग्रेसचा विभागीय जनआक्रोश मेळावा - माणिकराव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 7:34 PM