मोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:40 PM2019-01-19T18:40:53+5:302019-01-19T18:47:30+5:30
एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.
कोल्हापूर : एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.
चव्हाण यांनी शनिवारी दुपारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन देश आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत मनमोकळी चर्चा केली. संपादक वसंत भोसले यांनी स्वागत करून त्यांना विविध विषयांवर बोलते केले.
देशपातळीवरील राजकारणाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हिंदी भाषिक पटट्यामध्ये भाजपने गेल्या लोकसभेवेळी २७३ पैकी २२३ जागा मिळवल्या होत्या. परंतू याच पटट्यात आता आमची युपीए आघाडी मजबूत झाली आहे. त्यामुळे येथे भाजपच्या १00 ते ११0 जागा कमी होणार आहेत.
कर्नाटकात त्यांच्या १७ जागा आहेत त्या ५/६ पर्यंत खाली येतील. पुर्व भारतातील ७ जागा त्यांना टिकवता येणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोव्याच्या एकूण ५0 जागा आहेत. मात्र शिवसेनेबाबत युती होणार की नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत इथले चित्र सांगणे अवघड आहे.
उत्तर प्रदेशमध्ये जरी सप, बसप युती झाली असली आणि आम्हांला पाऊल मागे घ्यावे लागले असले तरी तेथील वरच्या वर्गातील मते ही आम्ही निवडणूक नाही लढवली तर भाजपकडेच जाणार. ती जावू नयेत यासाठी आम्ही तेथे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उपव्यवस्थापक (मनुष्यबळ आणि प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांच्यासह संपादकीय सहकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.
आरएसएसला हात झटकता येणार नाहीत
आरएसएसने मोदी यांना आणले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकणं सहज शक्य नाही याची जाणीव आरएसएसलाही झाली आहे. त्यामुळे चूक झाली हे तर आरएसएसने मान्य करावे किंवा मोदी जे करत आहेत ते बरोबर आहे असे जाहीर करावे. यापुढच्या काळात आम्हीच आरएसएसला याबाबत जाब विचारणार आहोत.
सांगलीतून मी लढणार नाही
सांगली लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे असे समजले. मात्र माझा पूर्वीचा मतदारसंघ आता राहिलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाच्या चर्चेत अर्थ नाही. मी तेथून निवडणूक लढवणार नाही.
महाराष्ट्रामध्ये दुष्टपणाने सरकार चालवलं जातंय
महाराष्ट्रामध्ये अतिशय दुष्टपणाने सरकार चालवलं जात असल्याचा आरोप यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यातही कोल्हापुरातून राज्याला एक देणगी मिळाली आहे. महसूल खात्यातील भ्रष्टाचार टोकाचा वाढला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.