फुलंब्री (औरंगाबाद) : गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेल्या येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे प्रणीत शेतकरी सहकारी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलचा पुरता धुव्वा उडाल्याने भाजपाला राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी येथील खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.कारखान्यातील २१पैकी २० जागांवर काळे यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले. तर सोसायटी मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराचा अवघ्या ४ मतांनी पराभव झाला. सोसायटी मतदारसंघात बागडे यांच्या पॅनलचा उमेदवार विजयी झाला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन विलास औताडे यांच्या शेतकरी एकता विकास सहकारी पॅनलला खातेही उघडता आले नाही. देवगिरी साखर कारखाना बंद असला तरी त्याची निवडणूक मात्र रंगतदार झाली. बागडे यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यांत अनेक ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या. बागडे व काळे यांच्या पॅनलमध्येच प्रमुख लढत होती. (प्रतिनिधी)
‘देवगिरी’वर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
By admin | Published: July 19, 2015 1:46 AM