अकोला: बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका दलालाला मंगळवारी ताब्यात घेतले. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्या चौकशीतून महत्त्वाच्या माहितीसोबतच तहसील कार्यालयातील काही कर्मचार्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकार्याची स्वाक्षरी, शिक्का, बार कोड आणि एमआरसी क्रमांकाचा वापर करून बोगस जात प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक बाब ७ जून रोजी उघडकीस आली होती. अकोल्यातील गोपाल बाबूलाल चाकर यांचा मुलगा नीळकंठ चाकर इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार्या नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्राकरिता नीळकंठ गोपाल चाकर याचा प्रस्ताव सेतु केंद्रामार्फत अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्रावर उपविभागीय अधिकार्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गत ७ जून रोजी गोपाल चाकर आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले अकोल्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी त्यांच्या प्रस्तावाची पडताळणी केली असता, प्रस्तावासोबत जोडण्यात आलेले नीळकंठ चाकरच्या जात प्रमाणपत्रावरील बार कोड, एमआरसी क्रमांक तसेच उपविभागीय अधिकार्याची स्वाक्षरी आणि शिक्का बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे नीळकंठ चाकर याचे धोबी जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उपविभागीय अधिकार्यांनी चाकर यांना सांगितले. या प्रकाराने अकोल्यात बनावट बार कोड, उपविभागीय अधिकार्याची स्वाक्षरी आणि शिक्क्याचा वापर करून, चार ते पाच हजार रुपयांमध्ये बोगस जात प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची बाब उघडकीस आल्याने कोतवाली पोलिसांनी मंगळवारी एका जणास ताब्यात घेतले असून, पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. त्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती समोर आल्यास किंवा त्याचा बनावट प्रमाणपत्र प्रकरणात समावेश दिसून आल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील.
बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी दलाल पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: June 15, 2016 2:04 AM