पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी असलेल्या व जमावाला भडकाविल्याच्या आरोपाखाली कबीर कला मंचचे सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना सोमवारी ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास जानेवारीमध्ये एनआयएकडे सोपविण्यात आला होता. एनआयएकडे एल्गार परिषदेचा तपास सोपविण्यात आल्यानंतरही या प्रकरणातील ही पहिलीच कारवाई आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या परिषदेच्या माध्यमातून जमावाला भडकाविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे़ पुणे पोलिसांकडे तपास असताना १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे पोलिसांनी पुणे, मुंबई आणि नागपूर येथे एकाचवेळी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घातले होते. त्यात वाकड येथील सागर गोरखे याच्या घरातून पोलिसांनी सीडी, पुस्तके, पेन ड्राईव्ह अशा वस्तू जप्त केल्या होत्या.तसेच पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
दरम्यान, सागर गोरखे याला दर रविवारी वाकड पोलीस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काल रविवारी तो आला नसल्याची समजते.तसेच या दोघांचे मुंबईतील वकिलांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे. मात्र, एनआयएकडून अद्याप त्यांच्याविषयीही काहीही माहिती दिलेली नाही.