बारामती : भाजप महाजनादेश यात्रेच्या वेळी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली.तसेच, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्याचा तसेच त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपुर्वी अजित पवार यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना बारामतीत या, तुम्हाला दाखवतोच, अशी जाहीर दमबाजी केलेली होती. बारामती येथे महाजनादेश यात्रेतील राष्ट्रवादी च्या हुल्लडबाजीमागे या दमबाजीचे ' कनेक्शन' असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नितीन भामे यांनी केला आहे.अॅड भामे यांनी गोंधळ घालणाऱ्या २०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत भामे यांनी पोलीस अधिक्षकांना पत्र पाठविले आहे. बारामती येथे मुख्यमंत्र्यांसमवेत जलसंपदामंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत यात्रा येण्याबाबत चा कार्यक्रम ७ दिवसांपुर्वीच प्रसारीत केला होता. त्राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्या धमकी नुसारच पुर्वनियोजीत कट करून सदर महाजनादेश यात्रा स्वागत सभेमध्ये गोंधळ व हुल्लडबाजी करायची असा आदेश कार्यकर्त्यांना दिलेला होता,असा आरोप अॅड. भामे यांनी केला आहे. त्यानुसार महाजनादेश यात्रा बारामती पेन्सिल चौक येथे आली त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून रॅली अडवण्याचा प्रयत्न केला. हुल्लडबाजी करून मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा तसेच त्याचे सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलीस प्रशासनाने केवळ बघ्याचीच भुमिका घेतली. भाजपा कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करून वेळ मारून नेली. परंतु, त्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला नसल्याचे भामे यांनी म्हटले आहे._ वास्तविकत: मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीतील महाजनादेश यात्रेत मोठा घातपात घडवून आणण्याचे कारस्थान व षडयंत्र रचले असल्याबाबत दाट संशय व्यक्त केला जात आहे. या पूवीर्ची पवार महाजन वादाची पार्श्वभूमी, महाजनादेश यात्रेमधील स्थानिक प्रशासन तथा पोलीस प्रशासनाची बोटचेपी संशयास्पद भुमिका तसेच स्थानिक प्रशासनाने ढिसाळ नियोजनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भामे यांनी केली आहे.
महाजनादेश यात्रेतील ''राष्ट्रवादी'' च्या हुल्लडबाजीमागे ''त्या '' दमबाजीचे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 8:15 PM
काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना जाहीर दमबाजी केलेली होती....
ठळक मुद्दे भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप