मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:18 AM2024-03-01T06:18:36+5:302024-03-01T06:19:19+5:30

MVA Seat Sharing: आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार हे निश्चित झाले असून, सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत.

Consensus on MVA's seat allocation formula? Vanchit 2, Raju Shetty 1; Official announcement in two days | मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र २०-१८-१० असे ठरले आहे. यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी २ जागा सोडणार असल्याचे समजते. दिवसभर चाललेल्या  या बैठकीला शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 

ठाकरे गट मुंबईत चार जागा लढणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट मुंबईत ४ जागा लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढणार आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर ठाकरे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबई ही जागा ठाकरे गटाकडे आहे. पण काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी बरोबर आल्यास ईशान्य मुंबई ही जागा वंचितला सोडली जाण्याची शक्यता आहे.

मित्रपक्षांना तीन जागा 
nमविआच्या मित्रपक्षांना हे तीन पक्ष आपल्या वाट्याच्या तीन जागा सोडणार आहेत. यात ठाकरे गटाच्या २० जागांपैकी दोन जागा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला सोडण्यात येतील. 
nतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या १० जागांपैकी एक जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाणार असल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत येत्या एक-दोन दिवसांत आंबेडकर यांच्याशी चर्चा होणार आहे.

आम्हीही मविआसोबत : आनंदराज आंबेडकर
nआम्हीही महाविकास आघाडीसोबत असून, अमरावतीची  एक जागा आम्हाला लढवायची आहे, असे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर म्हणाले. 
nकाल मी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो. तुमची आम्हाला गरज आहे. आता तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला त्यांना मी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार हे निश्चित झाले असून, सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत. त्याखालोखाल काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा मिळतील.

Web Title: Consensus on MVA's seat allocation formula? Vanchit 2, Raju Shetty 1; Official announcement in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.