राजू ओढे,
ठाणे- महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस हायवेच्या विकासासाठी ठाणे जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांनी त्यांच्या ४८१ हेक्टर जमिनीचे संमतीपत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला शुक्रवारी दिले. शेतकऱ्यांच्या पुढाकारामुळे समृद्धी कॉरिडॉरचा ठाणे जिल्ह्यातील मार्ग प्रशस्त झाला आहे.मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस हायवेचा लाभ ठाणे जिल्ह्यातील काही गावांना होणार आहे. या महामार्गाचा ६७ किलोमीटर भाग ठाण्यातून जाणार आहे. या प्रकल्पाचा लाभ होणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनाचे काम सुरू असून त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शहापूर तालुक्यातील काही गावांना शुक्रवारी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांमध्ये प्रकल्पाविषयी उत्सुकता दिसून आली. ठाण्यापासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील फुगाळे, वाशाळा बुद्रुक आणि टोकरखंड गावांमधील शेतकऱ्यांशी मोपलवार यांनी चर्चा केली. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे फायदे त्यांना समजावून सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन केले. बहुतांश शेतकऱ्यांनी जमिनीचा योग्य मोबदला, रोजगार आणि विकासाशी संबंधित इतर मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. मोपलवार यांनी सर्वच मुद्यांवर शेतकऱ्यांचे समाधान केले. त्यानंतर, फुगाळे येथील ७६ शेतकऱ्यांनी ३११ हेक्टर, वाशाळा बुद्रुक येथील २५ शेतकऱ्यांनी १४० हेक्टर तर टोकरखंड येथील १७ शेतकऱ्यांनी ३९ हेक्टर जमिनीचे संमतीपत्र मोपलवार यांना दिले. शहापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या या गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा लाभ राज्यातील ३८१ गावांना होणार आहे. या प्रकल्पामुळे नवनवे उद्योग उभे राहतील, गावांचा विकास होईल. रोजगारनिर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल की, या गावांमधील एकही तरुण बेरोजगार राहणार नाही, अशी माहिती मोपलवार यांनी यावेळी दिली. बहुतांश शेतकऱ्यांच्या प्रश्नांमधून प्रकल्पबाधित या शब्दाचा पुनरुच्चार होत होता. या शब्दाचा वापरच मुळात सयुक्तिक नसल्याचे मोपलवार यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे कुणीही बाधित होणार नाही. उलटपक्षी लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संकोच न ठेवता या प्रकल्पास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जमिनीचे संमतीपत्र लगेचच दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय भोंडे, ठाण्याच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, शहापूरचे तहसीलदार रवी बाविस्कर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. >प्रस्तावित मार्गात वन्यप्राण्यांसाठी विशेष व्यवस्था प्रस्तावित महामार्ग ज्याज्या भागातील वनक्षेत्रास छेदून जाणार आहे, तिथे तिथे वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी महामार्गाच्या खालून अथवा वरून भुयारी मार्ग तयार केला जाईल. या मार्गाच्या दुतर्फा दाट झाडी राहणार असून तो वनक्षेत्रासारखाच राहील, याबाबत काळजी घेतली जाणार असल्याचे राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले.