संख : जत तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, मका आदी पिकांच्या काढणीस सुरूवात झाली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यांचा पिकावर थोडाफार परिणाम झाला असून, अपवाद वगळता पीक चांगले आले आहे. दर हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याच्या अपेक्षेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.रब्बी हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊस चांगला झाल्याने ७२ टक्के पेरणी झाली होती. यावर्षी ६८ हजार २०० हेक्टर ज्वारी, २ हजार ३०० हेक्टर गहू, २ हजार हेक्टरवर हरभरा, २ हजार हेक्टरवर करडई, ३ हजार १०० हेक्टर, ४ हजार हेक्टर मका लागवड झाली आहे. तीन वर्षानंतर प्रथमच यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती लागला. त्यानंतर पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने रब्बीचीही पेरणी चांगली झाली. अनुकूल, हवामान आक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस, यामुळे उगवणही चांगली झाली. शिवारभर पिके बहरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनुकूल स्थितीमुळे दर हेक्टरी उत्पादनात वाढ होणार आहे. ज्वारीचे दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण व पश्चिम-पूर्व वाऱ्यांमुळे दाणे टपोरे भरले आहेत. त्यानंतर फुलोऱ्यात असलेल्या ज्वारीला मात्र अवकाळीचा फटका बसला. कणसातील दाणे काळे पडले आहेत. फुलोराही गळून गेला आहे. मका मात्र जोमाने आला आहे. शेतकऱ्यांनी संकरित वाण वापरल्याने हेक्टरी उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या बाजारात मक्याला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची काढणीची सुरू झाली आहे. (वार्ताहर)मजुरांचा तुटवडातालुक्यातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ४५ हजार मजूर ऊस तोडणीसाठी बाहेर पडले आहेत. तसेच शेतीकामाच्या धांदलीमुळे गावकट्टे ओस पडलेले दिसत आहेत. सध्या द्राक्ष काढणी तसेच बेदाणा शेडवर वेचणीचीही कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे इतर शेतीच्या कामांसाठी मजुरांचा तुटवडा निंर्माण झाला आहे. परिणामी मजुरीच्या दरातही वाढ झाली असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुरूषांना २५०, तर महिलांना २०० रूपये मजुरी द्यावी लागत आहे. दोन्ही हंगाम यशस्वीयंदा १७ वर्षानंतर प्रथमच शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन्ही हंगाम हाताशी आले आहेत. कायम दुष्काळी असलेल्या या तालुक्यात कायमचा दुष्काळ, प्रतिकूल हवामान यामुळे कधी खरीप, तर कधी रब्बी हंगामावर पाणी सोडावे लागत होते. दुबार पेरणीचा उपद्व्याप करावा लागत होता. यंदा मात्र शेवटच्या टप्प्यातील अवकाळीचा फटका वगळता खरीप व रब्बी दोन्ही हंगामात यशस्वी उत्पादन मिळाले आहे. जूनमध्ये मान्सूनच्या हजेरीने खरिपातील बाजरी, सूर्यफूल, मका, इतर कडधान्ये, गळीत धान्ये, तेलबियाची पिके चांगली मिळाली. रब्बीतही अवकाळीचा तडाखा वगळता परतीचा पाऊस, अनुकूल हवामान यामुळे पिके बहरली आहेत.
जत तालुक्याला ‘रब्बी’चा दिलासा
By admin | Published: February 16, 2015 9:53 PM