मुंबई - भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला शौर्यदिनाच्या द्विशतक महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी जाणा-या दलित कार्यकर्त्यांवरील हल्ला हा दलित आणि मराठा संघर्ष पेटविण्याचा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.परिसरातील सवर्ण मराठा समाजाची ही कृती निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करतानाच दलित मराठा संघर्ष पेटविण्याचे षडयंत्र रोखण्यासाठी मराठा आणि दलितांनीही संयम राखत शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.भीमा कोरेगाव येथील सणसवाडी व परिसरात भीम अनुयायांवर हल्ला होत असल्याचे कळताच आठवले यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्वरित कारवाईची मागणी केली. वढू गाव येथे शूरवीर गोविंद गायकवाड यांच्या समाधीची काही अज्ञातांनी तोडफोड केली. त्याबद्दल येथे झालेला वाद मिटलेला असताना तो उकरून काढण्याचा प्रयत्न होत आहे. भीम अनुयायांवरील हल्ल्याप्रकरणी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचेही आठवले यांनी सांगितले.चौकशीची मागणीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी केली आहे. शौर्य लढ्याला यंदा २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक येतील, याची कल्पना सरकारला होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे वातावरण तणावपूर्ण होते. तरीही पोलिसांनी पुरेशी सुरक्षाव्यवस्था न ठेवल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.
हे तर दलित - मराठा संघर्ष पेटविण्याचे षड्यंत्र - रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 5:21 AM