ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 11 - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेला अटक करण्यामागे सनातनची प्रतिमा मलीन करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलमधील डॉक्टर वीरेंद्र तावडे याला संशयावरून अटक केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक असून हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता असलेल्या तावडे याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा संशय आहे.
सनातन संस्थेने शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली भुमिका मांडली. 'सीबीआयकडे कोणतेही ठोस पुरावे नसून सनातनची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेसच्या काळात जे झालं ते आताही होतं आहे. काँग्रेसच्या काळात जो छळ होत होता, जो षडयंत्राचा अनुभव येत होता, तोच अनुभव आता सत्ता बदलानंतरही येत आहे', असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी यावेळी केला आहे. 'गरीब घराण्यातल्या तावडेला सडवलं जात आहे', असंही अभय वर्तक बोलले आहेत.
'भाजप सरकारच्या आश्रयाने हे सगळं घडत आहे. हिंदुत्वाचे सरकार सत्तेवर येऊनही हिंदुत्वाचा छळ थांबत नाही याचं दु:ख असल्याचं', अभय वर्तक यांनी म्हटलं आहे. हिंदू जनजागरण समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी 'वीरेंद्र तावडे २००७ पू्र्वी हिंदू जनजागृती संघटनेचे कार्यकर्ते होते, पण आता नाहीत', अशी माहिती दिली आहे.
यादरम्यान वीरेंद्र तावडेला शिवाजी नगर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
Narendra Dabholkar murder case: Accused Virendra Tawde being taken to Pune from CBI office in Navi Mumbai pic.twitter.com/ZAYzAQty5M— ANI (@ANI_news) June 11, 2016