नागपूर : भाजपा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे देशावर संघाची विचारधारा थोपविण्यासाठी हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय महासचिव खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी केली.रिपब्लिकन परिवारतर्फे रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित ‘संघीकरणविरोधी परिषदे’चे उद्घाटक म्हणून येचुरी बोलत होते. ते म्हणाले, आरएसएसला धर्मावर आधारित देशाची रचना पूर्वीपासूनच करायची आहे. त्या दिशेने त्यांचे काम सुरू आहे. राजकारणात भाग घेणार नाही, या अटीवर आरएसएसवरील बंदी मागे घेण्यात आली. तेव्हा आरएसएसने स्वतंत्र राजकीय संघटन उभे केले. यातून जनसंघाची स्थापना झाली. नंतर भाजपात त्याचे रूपांतर झाले. त्यामुळे भाजपा संघापासून वेगळा नाही.आम्ही (कम्युनिस्ट) आर्थिक क्षेत्राच्या न्यायासाठी लढण्यासंदर्भात जो विश्वास निर्माण करू शकलो. तसा विश्वास आम्हाला सामाजिक न्यायासाठी निर्माण करता आला नाही, अशी कबुली देत डॉ. आंबेडकरांच्या विचारातील भारत घडविण्यासाठी आर्थिक व सामाजिक न्यायाची लढाई कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी यांनी मिळून लढावी, अशी सादही खा. येचुरी यांनी यावेळी घातली.बिहारमध्ये दिल्लीची पुनरावृत्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी याचे ‘मॅजिक’ दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. लोकसभेच्या निकालानंतर विरोधी पक्ष सिटी बसमध्ये जाण्यापुरता शिल्लक राहिला, अशी टीका करणाऱ्या मोदींचा पक्ष दिल्लीच्या निकालात आॅटोने जाण्यापुरताही राहिला नाही. जनता जागरूक झाली आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत दिल्लीची पुनरावृत्ती होईल, भाजपाचा पत्ता साफ होईल, असा दावा खासदार येचुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र
By admin | Published: October 05, 2015 3:34 AM